Sunday, 25 June 2023

Ambedkar Jayanti

 घटनातज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजशास्त्रज्ञ, वकील, लेखक, संपादक, शिक्षणतज्ञ, वक्ता, धर्मज्ञ, क्रांतिकारक, समाज सुधारक,महिला उद्धारक, व्यासंगी विचारवंत, प्रखर राष्ट्रभक्त ....



मी स्वतः जातीप्रथेचेनिर्मुलन(Annihilation ऑफ caste) वाचत असताना मला जाणवलं की एका समाजसुधारक ह्यांनी तयार केलेले भाषणाचे रूपांतर पुढे सगळ्यात प्रसिद्ध पुस्तकात होते आणि पुढे तेच घटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारक महामानव  झाले .


एक एक गुणवत्ता मिळवण्यासाठी माणसं आपलं  पूर्ण आयुष्य खर्ची घालतात आणि इतकं करूनही त्या क्षेत्रातील उच्च स्थान मिळतेच असे नाही. तरीही जे मिळते त्याचा बरेचदा प्रचंड अहंकार असतो

पण बाबासाहेबांनी एकाच आयुष्यात या सर्व गुणवत्ता मिळवल्या आणि केवळ मिळवल्याच नाही तर त्या  विषयात उच्च मानदंड इतका प्रस्थापित  केला की ज्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मध्ये त्यांनी शिक्षण घेतले तिथे त्यांचं स्मारक उभा राहील आणि  ते symbol of knowledge झाले.


बाबासाहेब प्रज्ञा सूर्य आणि महीला उद्धारक ठरतात ते यामुळे.


आपले वैचारिक गुरू महात्मा फुले ह्यांचा वारसा पुढे नेत अस्पृश्यतेच्या भयाण अंधःकारातून समाजातील फार मोठ्या दुर्लक्षित घटकाला  आणि सर्व महिलांना बाहेर  काढलं. त्याच  आज फलित म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्या अनुसूचित जनजाती असून सुद्धा महामहीम राष्ट्रपती झाल्या. शककर्त्या शालिवाहनाप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांच्या जगण्यात प्राण ओतले. 'उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे'. 


बाबासाहेब विश्व-वंदनीय ठरतात ते यामुळे.


आपल्या सर्व गुणवत्तांचा उपयोग करून वैयक्तिक आयुष्यात वाट्टेल ते त्यांना मिळवता आलं असत. पण ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून, स्वतःच्या आणि  परिवार च्या सुखदुःखाची किंचित पर्वा न करता आपलं सगळं कर्तृत्व त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी पणाला लावलं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचं तर 'गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे' असं बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन होतं.


बाबासाहेब अनुकरणीय ठरतात ते यामुळे.


कोणत्याही मानवाचे मूल्यांकन त्याने आयुष्यात काय केले, काय मिळवले यावरून केले जाते. पण काही माणसे आपल्या कार्याचा ठसा काळावर असा काही उमटवतात की पुढची कितीतरी शतकं, राष्ट्राच्या पिढ्या न् पिढया त्यांच्या अनुयायी बनून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहतात. 


बाबासाहेब महामानव ठरतात ते यामुळे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले, समतायुक्त-शोषणमुक्त-एकात्म समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  त्यांनी स्वतः 395 कलम आणि 22 परिशिष्ट ह्यांची राज्यघटना तयार करून सर्व घटकांना मूलभूत अधिकार दिले .आपले अधिकार आणि कर्तव्य  आपण समजून घेऊन राष्ट्र उभारणी साठी प्रयत्न करणे हीच आजच्या जयंती दिनी बाबासाहेबांना मानवंदना.


शब्दांकन

प्रा.अमन भिमराव कांबळे

MIT ADT University Loni pune

Birthday -Satej Patil

 महात्मा ज्योतिबा फुले , राजर्षी शाहू महाराज आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय  साठी उभारण्यात आलेल्या शिक्षण चळवळीला सामर्थ्याने पुढे नेत आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ .डी वाय.पाटील ह्यांच्या दिव्य स्वप्नातून साकारण्यात आलेल्या डॉ .डी वाय.पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आकुर्डी पुणे  चे चेअरमन  नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील सर ह्यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त  हार्दिक शुभेच्छा .

त्यांच्या वाढदिवसानिमित्त  अभिष्टचिंतन करताना त्यांचे  सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय  अष्टपैलू व्यक्तीमत्व ह्यावर किंचित सा प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न असेल.

एक संयमी आणि लोकाभिमुख राजकारणी म्हणूंन ओळख असणारे सतेज पाटील सर हे त्यांच्या उच्चशिक्षित आणि अगदी महाविद्यालय पासूनच राजकारण क्षेत्रात सक्रिय सहभाग ह्यामुळे  वेगळे दिसतात .

त्यांची लोकांबद्दल असणारी जवळीक हि कोल्हापूर च्या जनतेला नेहमीच जाणवत असते . त्यांचे राजकारण हे तिथल्या सर्वच जनतेच्या कल्याणासाठी असते हि तेथील लोक स्वतः सांगतात .

कोल्हापूर सोबत कोकण भूमी वर आलेल्या अस्मानी संकटाला भिडताना आपल्या स्वतःच्या प्रकृतीची किंचित हि काळजी न-करता एका होडीत बसून लोकांसाठी मदत करणाऱ्या ह्या व्यक्तीमत्वाला पाहताना माझे हि अश्रू उभे राहिले .

स्वतः एवढ्या मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा त्याच्या मोठेपणाचा थोडा हि गंध त्यांच्या वागणुकीत महाराष्ट्राने कधी पहिला नाही. साधी राहणी आणि सुसंकृत व्यक्तीमत्व हे त्यांचं वेगळपण महाराष्ट्राने अनुभवलं आहे. 

शैक्षणिक कार्या ला पुढे नेत त्यांनी  १४ लाख विद्यार्थ्यांना ६५ लाख वह्या पुस्तके ची केलेली मदत करताना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचा कार्याची नोंद घेत केलेला गौरवशाली  सन्मान आहे .

कोल्हापूरच्या मायभूमीमध्ये स्वराज्य सौदामिनी  ताराराणी च्या कार्याचा इतिहास सांगताना महिला सबलीकरणासाठी केलेले हजारो  बचत गट हे उल्लेखनीय आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातील गाव जत्रे पासून ITहब चे लोकार्पण असो वा विमानतळाची निर्मिती प्रत्येक कामात जिकरीने लक्ष घालत आणि स्वतःच्या यशाचे विक्रम मोडीत आणि लोककल्याणाचा वास मांडत श्री. सतेज सर आव्हानांना सामोरे जात आहेत .

आयुष्यचं अवघं अर्धे शतक पूर्ण करून विकासाच्या अनेक शतकवीर सलामी देणाऱ्या श्री सतेज उर्फ बंटी पाटील सर ह्यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त  हार्दिक शुभेच्छा .

शब्दांकन  

श्री अमन कांबळे

Computer engineering Department


एक चित्त थरारक अनुभव : प्रवास राजगडचा

 

एक चित्त थरारक अनुभव : प्रवास राजगडचा

दिनांक १२ मार्च २०२३ रोजी पहाटे ०३:०० वाजता पुणे येथुन मनातील असंख्य उल्हासदायी आणि अपेक्षांनी सुरु झालेला माझा प्रवास. स्वराज्याची प्रथम राजधानी राजगड पाहिल्यानंतर मला हे विस्तृत स्वरूपात मांडण्यास परावृत्त करत आहे.

असे म्हणले जाते कि, “काशी, गया, मथुरा, प्रयाग एका जागी आणि राजगडाची श्रीमंती एकाजागी”.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पावन पद स्पर्शाने पावन झालेली पावन भुमी किल्ले राजगड, बाल्लेकिल्ला, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची पाहून आपल्या लाडक्या राजा बदल आणखीच अभिमान वाटावा आणि त्याच महाराजांवर आपल्या जीवाची पर्वा करता धारातीर्थीं पडणारे सर्व पराक्रमी मावळे ह्यांच्या बलिदानाचा विचार करूनच मन भारावून गेले, कित्येक वेळा डोळे पाणावले देखील, अंगावर शहारे देखील आले.

ह्या माध्यमातून मी माझे अनुभव आणि गडाच्या सद्यस्थिति वर प्रकाश टाकणार आहे.

तसा शिव-चरित्र आणि माझा खु जवळु संबध राहिला आहे. ह्यासाठी कारणीभूत म्हणजे पुस्तकांचे वाचन, प्रतापगड सारखे महाराजांच्या शौर्याच्या यशोगाथेची कीर्ती साता समुद्रापार पोहचवणारे दुर्ग, माझे मार्गदर्शक डॉ. रवींद्र देशमुख ज्यांनी मला खरे महाराज समजावु सांगितले.

राजगड पाहण्याची एक संधी जी डॉ. रवींद्र देशमुख सरांसोबत JNEC मध्ये असताना गमावली होती. आता हि दुसरी संधी सोडणे माझ्यासाठी अशक्य होते, म्हणुनच खु सारा कामाचा व्याप आणि मानसिक थकवा असताना सुद्धा प्रा. अमितला लगेच रात्री ११:०० वाजता होकार देऊन टाकला. पहाटे ०:०० वाजता गजर वाजला आणि मी माझ्या प्राध्यापक मित्रांसोबत निघालो.

बघता बघता ०६:३० वाजले आणि गड सर करण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा सुखकर आणि मनाला आस लावून जाणारा प्रवास पुढे खुप काही सांगून गेला.

माझे सर्व मित्र फोटो काढत गाणे म्हणत पुढे जात होते पण पूर्ण प्रवासादरम्यान मी माझी गती कायम संथ ठेवली.

प्रत्येक वळण आणि त्यावर लावलेले विविध सुचना फलक मी अगदी बारकाईने पाहत होतो. दरम्यान मला दिसलेल्या सगळ्याच आजीबाई ज्या कोणी पिण्याचे पाणी, लिंबू शरबत ई. घेऊन बसल्या होत्या त्यांच्याकडे पाहून असंख्य प्रश्न उभे राहिले, ज्यांची उत्तरे मी ह्या प्रवासात शोधणार होतो.

गडाची वाट तशी बिकट आहेच, पण त्या वर प्रशासनाचे काडीमात्र लक्ष नाही हे मात्र अगदी खरे. एकावेळी एकच व्यक्ति चालू शकतो एवढीच जागा आहे. बाजूची तयार केलेली लोखंडी तटबंदी ढासळू लागली आहे.

त्यातच चोर-दरवाजा तर मला देवच दाखवून गेला. समोर २० वर्षांहुन अधिक काळ स्वराज्याची राजधानी म्हणुन उभा असलेला राजगड होता. मी महाराणी सईबाई ह्यांच्या समाधीचे दर्शन घेतले, ज्यावर एक साधे छप्पर देखील नाही. मनाला खच बसली की शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांस जन्म देणारी माऊली जिने येथे देह ठेवला त्या समाधीची अशी अवस्था असावी का? एक मंदिर ज्यात देवी पद्मावतींची मूर्ती आहे, तिथे अंधारात मी बसलो. जेथे महाराज वावरले आणि मॉंसाहेब राहिल्या त्या गडावर मी थोडासा विसावलो.

पुढे एक भयंकर असा दुर्ग म्हणजेच महाराजांचा बालेकिल्ला माझी वाट पाहत होता. चढण्यास एकदम अवघड असून सुद्धा मी मनाची तयारी केली. मध्येच वाटत होते की उगीच आलो आहोत आपण येथे पण मागे असणारे माझे मित्र मला एक आत्मविश्वास देत होते. पायात गड सर करण्यासाठी लागणारा ट्रेकिंग बूट नसून सुद्धा हे धाडस मी करत होतो. मनावर प्रचंड ओझे घेऊन मी चालत होतो जे स्पष्टपणे माझ्या चेहऱ्यावर सगळ्यांना दिसू लागले.

वय वर्ष ८२ असणारे आजोबा ज्यांनी मला एक नवी उमेद दिली. सोबत असणारे प्रा. विरेश मला उतरणीचे बारकावे सांगत होते.

४०० वर्षांआधी लोक कसे ये - जा करत असतील हा प्रश्न अजूनही तसाच आहे. ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट कळते की महाराजांची कार्यशैली आणि व्यवस्थापण त्याच बरोबर प्रशासनावरील पकड आजच्या काळात साधणे तसे अवघडच.

गडावर कुठेच पिण्याचे पाणी सध्या दिसले नाही जे आधी नक्कीच होते. गल्ली आणि नाक्यावर उभे केलेले पाणी शुद्धीकरन यंत्र गडावर का नाही. गडावरील पाण्याचे झरे अजुनही आहेत पण ते शुद्ध नाहीत म्हणुन लोक एक लिटर पाण्याची बॉटल ४० रुपये देऊन विकत घेतात हे आपल्या आजच्या २१ व्या शतकातील प्रशासानाचे व्यवस्थापण. कुठे साफसफाई तर सोडाच कसलीही सोय नाही हे दुर्भाग्यच. माझे NSS चे विद्यार्थी मोठ्या हर्षाने सेवे साठी जातात पण त्यांच्या सुरक्षेचे काय?

हा इतिहास आपण असाच आपल्या भावी पिढीपुढे ठेवणार आहोत का? हा माझा प्रश्न.

सगळ्या ऐतिहासिक गोष्टींचे जतन व्हावे ह्यासाठी खर्च केला जाणारा कोटींचा निधी माझ्या महाराजांच्या गड किल्ल्यांपर्यंत का पोहचत नाही हे अजून उमगले नाही.

पुरातत्व विभाग फक्त ठराविक ऐतिहासिक गोष्टींचे जतन करते का? वन विभाग फक्त ठराविक जागीच लक्ष देणार का?

सरकार कोणाचेही असू देत पण ही गोष्ट कायम ध्यानात असावी कि हिंदवी स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राज्य करतात. व त्यांच्यावर कुठलेही बंधन नाही.

लहान – थोर, माझ्या माता – भगिनी, परदेशातुन येणारे नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याप्रती असणाऱ्या आदरामुळेच गडावर येतात. त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारून आणि गडाच्या पर्यावरणाचे पावित्र्य आपण सर्वानी राखले तरच महाराजांचे हे स्वराज्य “बहुजन हिताय - बहुजन सुखाय” होईल.

शब्दांकन : प्रा. अमन भि. कांबळे

(संगणक अभियांत्रिकी विभाग)






 लोणी मधील हरी नामाचा जागर-

आवाजाचे जादूगार ह.भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील ह्यांचे कीर्तन ऐकण्याच्या योग काही दिवसांपूर्वी आला. भरतगाव वाडी जिल्हा सातारा येथे झालेले कीर्तन ऐकल्यावर एक बोध नक्की मिळाला की परमार्थ हा सवडीने नाही तर आवडीने केला पाहिजे. त्याच साठी ह्या वर्षी आपण ही वारी मध्ये काही तरी सेवा द्यावी ही संकल्पना घेऊन मी माझा सेवा भाव आणि सेवा धर्म मित्रांसमोर मांडला. मागील वर्षी DYP संस्थे मध्ये कार्यरत असताना काही किलोमीटर हा सेवा धर्म करता आला .यंदा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ह्यांची पालखी अनादी काळापासून लोणी  काळभोर येथे मुक्कामी असते आणि तिथेच सेवा करायची हा निश्चय माझे सेवा भावी बंधू  सचिन,विकास आणि भगिनी भाग्यश्री, पल्लवी, तेजस्विनी ह्यांनी पूर्णत्वास आणण्यासाठी तयारी सुरू केली . योगायोगाने MIT ADT विद्यापीठ जे की  लोणी इथे स्थित असून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम ह्यांच्या सोबतच विश्वातील असंख्य संताच्या विचारांनी प्रेरित हून उभारलेल्या वर्ल्ड पीस डोम साठी प्रसिध्द असल्यामुळे  आणि आम्ही सगळेच तिथे कार्यरत असल्यामुळे हा दुग्ध शर्करा योग आम्हाला  गमवायचा नव्हता. 

 सायंकाळी ६ वाजता , लाखोंचा जनसमुदाय  ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत असतानाच पालखी लोणी इथे MIT विद्यापीठ समोर आली .दर्शन घेऊन आम्ही आमची सेवा चालू केली . लोणी गावात २ ठिकाणी उपवासाचे राजगिरा लाडू चे वाटप आणि एका ठिकाणी पिण्याचे पाणी  ठेवण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत आम्ही आमचे हे कार्य चालू ठेवले  त्याच बरोबर दर्शन घेउन पाऊली खेळत ,हरी नामाचा जयघोष करत  घरी परतलो. ह्या कार्यासाठी राजकुमार,वैभव ,शहाजी , अभिषेक ह्यांनी खूप धावपळ करत आमची सेवेची संकल्पना पूर्ण केली.

 एकनाथ महाराज ह्यांच एक भारुड  पिंगळा महाद्वारीं असा आहे की

" हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल" हे आपल्याला आठवले पाहिजे .ज्यात परमार्थ का करावा आणि कधी करावा हे सांगितल आहे .वेळीच शहाणं होऊन समाजासाठी आवडीने काही तरी करावं हे सर्व संत श्रेष्ठ त्यांच्या सर्व अभंगातून सांगतात .

हजारो वर्षाहून अधिक काळ झाला असेल ही वारी चालते  तरी ह्याजन्मी देहू आळंदी ते पंढरपूर पर्यंत जाणाऱ्या लाखो माऊलींच्या चेहऱ्यावर असणारा हर्ष पाहून आणि परमेश्वर भेटीची ओढ पाहून आपण आपल्या सोबतच असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवू शकतो हे उमगले.

 काही तरी सेवा केल्याचा आनंद आणि पुढील वर्षी एक नवी संकल्पना मनाशी ठेऊन त्याचबरोबर माऊलीचा जप करत आम्ही जसा जमेल तसा परमार्थ साधला. 

 राम कृष्ण हरी माऊली

शब्दांकन

प्रा.अमन कांबळे