एक चित्त थरारक अनुभव : प्रवास राजगडचा
दिनांक १२ मार्च २०२३ रोजी पहाटे ०३:०० वाजता पुणे येथुन मनातील असंख्य उल्हासदायी आणि अपेक्षांनी सुरु झालेला माझा प्रवास. स्वराज्याची प्रथम राजधानी राजगड पाहिल्यानंतर मला हे विस्तृत स्वरूपात मांडण्यास परावृत्त करत आहे.
असे म्हणले
जाते कि, “काशी, गया, मथुरा, प्रयाग एका जागी आणि राजगडाची श्रीमंती एकाजागी”.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पावन पद स्पर्शाने पावन झालेली पावन भुमी किल्ले राजगड, बाल्लेकिल्ला, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची पाहून आपल्या लाडक्या राजा बदल आणखीच अभिमान वाटावा आणि त्याच महाराजांवर आपल्या जीवाची पर्वा न करता धारातीर्थीं पडणारे सर्व पराक्रमी मावळे ह्यांच्या बलिदानाचा विचार करूनच मन भारावून गेले, कित्येक वेळा डोळे पाणावले देखील, अंगावर शहारे देखील आले.
ह्या माध्यमातून मी माझे अनुभव आणि गडाच्या सद्यस्थिति वर प्रकाश टाकणार आहे.
तसा शिव-चरित्र आणि माझा खुप जवळुन संबध राहिला आहे. ह्यासाठी कारणीभूत म्हणजे पुस्तकांचे वाचन, प्रतापगड सारखे महाराजांच्या
शौर्याच्या यशोगाथेची
कीर्ती साता
समुद्रापार
पोहचवणारे दुर्ग, माझे मार्गदर्शक डॉ. रवींद्र देशमुख ज्यांनी मला खरे महाराज समजावुन सांगितले.
राजगड पाहण्याची एक संधी जी डॉ. रवींद्र देशमुख सरांसोबत JNEC मध्ये असताना गमावली होती. आता हि दुसरी संधी सोडणे माझ्यासाठी अशक्य होते, म्हणुनच खुप सारा कामाचा व्याप आणि मानसिक थकवा असताना सुद्धा प्रा. अमितला लगेच रात्री ११:०० वाजता होकार देऊन टाकला. पहाटे ०३:०० वाजता गजर वाजला आणि मी
माझ्या प्राध्यापक मित्रांसोबत निघालो.
बघता बघता ०६:३०
वाजले आणि गड सर करण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा सुखकर आणि मनाला आस लावून जाणारा प्रवास पुढे खुप
काही सांगून गेला.
माझे सर्व
मित्र फोटो काढत गाणे म्हणत पुढे जात होते पण पूर्ण प्रवासादरम्यान मी माझी गती
कायम संथ ठेवली.
प्रत्येक वळण
आणि त्यावर लावलेले विविध सुचना फलक मी अगदी बारकाईने पाहत होतो. दरम्यान मला
दिसलेल्या सगळ्याच आजीबाई ज्या कोणी पिण्याचे पाणी, लिंबू शरबत ई. घेऊन बसल्या
होत्या त्यांच्याकडे पाहून असंख्य प्रश्न उभे राहिले, ज्यांची उत्तरे मी ह्या
प्रवासात शोधणार होतो.
गडाची वाट तशी
बिकट आहेच, पण त्या वर प्रशासनाचे काडीमात्र लक्ष नाही हे मात्र अगदी खरे. एकावेळी
एकच व्यक्ति चालू शकतो एवढीच जागा आहे. बाजूची तयार केलेली लोखंडी तटबंदी ढासळू
लागली आहे.
त्यातच
चोर-दरवाजा तर मला देवच दाखवून गेला. समोर २० वर्षांहुन अधिक काळ स्वराज्याची
राजधानी म्हणुन उभा असलेला राजगड होता. मी महाराणी सईबाई ह्यांच्या समाधीचे दर्शन
घेतले, ज्यावर एक साधे छप्पर देखील नाही. मनाला खच बसली की शिवपुत्र छत्रपती संभाजी
महाराजांस जन्म देणारी माऊली जिने येथे देह ठेवला त्या समाधीची अशी अवस्था असावी
का? एक मंदिर ज्यात देवी पद्मावतींची मूर्ती आहे, तिथे अंधारात मी बसलो. जेथे महाराज
वावरले आणि मॉंसाहेब राहिल्या त्या गडावर मी थोडासा विसावलो.
पुढे एक भयंकर असा
दुर्ग म्हणजेच महाराजांचा बालेकिल्ला माझी वाट पाहत होता. चढण्यास एकदम अवघड असून
सुद्धा मी मनाची तयारी केली. मध्येच वाटत होते की उगीच आलो आहोत आपण येथे पण मागे
असणारे माझे मित्र मला एक आत्मविश्वास देत होते. पायात गड सर करण्यासाठी लागणारा ट्रेकिंग
बूट नसून सुद्धा हे धाडस मी करत होतो. मनावर प्रचंड ओझे घेऊन मी चालत होतो जे
स्पष्टपणे माझ्या चेहऱ्यावर सगळ्यांना दिसू लागले.
वय वर्ष ८२ असणारे
आजोबा ज्यांनी मला एक नवी उमेद दिली. सोबत असणारे प्रा. विरेश मला उतरणीचे बारकावे
सांगत होते.
४०० वर्षांआधी
लोक कसे ये - जा करत असतील हा प्रश्न अजूनही तसाच आहे. ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट
कळते की महाराजांची कार्यशैली आणि व्यवस्थापण त्याच बरोबर प्रशासनावरील पकड आजच्या
काळात साधणे तसे अवघडच.
गडावर कुठेच
पिण्याचे पाणी सध्या दिसले नाही जे आधी नक्कीच होते. गल्ली आणि नाक्यावर उभे केलेले
पाणी शुद्धीकरन यंत्र गडावर का नाही. गडावरील पाण्याचे झरे अजुनही आहेत पण ते
शुद्ध नाहीत म्हणुन लोक एक लिटर पाण्याची बॉटल ४० रुपये देऊन विकत घेतात हे आपल्या
आजच्या २१ व्या शतकातील प्रशासानाचे व्यवस्थापण. कुठे साफसफाई तर सोडाच कसलीही सोय
नाही हे दुर्भाग्यच. माझे NSS चे विद्यार्थी मोठ्या हर्षाने सेवे साठी
जातात पण त्यांच्या सुरक्षेचे काय?
हा इतिहास आपण
असाच आपल्या भावी पिढीपुढे ठेवणार आहोत का? हा माझा प्रश्न.
सगळ्या ऐतिहासिक
गोष्टींचे जतन व्हावे ह्यासाठी खर्च केला जाणारा कोटींचा निधी माझ्या महाराजांच्या
गड किल्ल्यांपर्यंत का पोहचत नाही हे अजून उमगले नाही.
पुरातत्व विभाग
फक्त ठराविक ऐतिहासिक गोष्टींचे जतन करते का? वन विभाग फक्त ठराविक जागीच लक्ष
देणार का?
सरकार कोणाचेही
असू देत पण ही गोष्ट कायम ध्यानात असावी कि हिंदवी स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे
ह्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राज्य करतात. व त्यांच्यावर कुठलेही बंधन
नाही.
लहान – थोर, माझ्या
माता – भगिनी, परदेशातुन येणारे नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याप्रती
असणाऱ्या आदरामुळेच गडावर येतात. त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारून
आणि गडाच्या पर्यावरणाचे पावित्र्य आपण सर्वानी राखले तरच महाराजांचे हे स्वराज्य “बहुजन
हिताय - बहुजन सुखाय” होईल.
शब्दांकन :
प्रा. अमन भि. कांबळे
(संगणक
अभियांत्रिकी विभाग)

No comments:
Post a Comment